मुरगाव शिमगोत्‍सव अध्यक्ष पदावरून वाद  

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मुरगाव शिमगोत्सव समिती अध्यक्षांचा वाद , निवडणूक आचारसंहितेवर अवल़ंबून

गोव्याचा पारंपरिक शिमगोत्सव वास्कोत मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून साजरा केला जात आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास सरकारकडून स्‍थापन केलेल्‍या समितीकडून याचे आयोजन केले जाते.

मुरगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेवर मुरगाव शिमगोत्सव समितीचा अध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे, तोपर्यंत दोघेजण अध्यक्ष बनले आहेत.

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. यावेळी जिल्हा पंचायत निवडणुका शिमगोत्सव काळात होत असल्याने आचारसंहितेची शक्यता आहे. तसे झाल्यास लोकप्रतिनिधींना आयोजन समितीवर स्थान राहणार नाही.

मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला. मुरगावचे नगरसेवक दीपक नागडे यांना अध्यक्षपदी निवडावे, असे त्यांच्या पाठिराख्यांनी जोर धरला, तर विद्यमान अध्यक्ष शेखर खडपकर यांनाच पुन्हा अध्यक्षपदी निवडावे, अशी बैठकीस उपस्थित असलेल्या बहुसंख्य नागरिकांनी मागणी केली. त्यामुळे बैठकीत वातावरण बरेच तापले.

बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणारे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्यासमोर यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला. अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात घालावे, या गहन चक्रात अडकलेल्या श्री. राऊत यांनी दोघांनाही अध्यक्ष बनवून वादावर पडदा टाकला. दरम्यान, मुरगाव शिमगोत्सव समितीच्या इतिहासात दोन अध्यक्ष निवडण्याचा प्रकार प्रथमच घडला.

दरम्यान, दीपक नागडे हे नगरसेवक असल्याने जिल्हा पंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास त्यांचे अध्यक्षपद जाऊन शेखर खडपकर यांना सर्वाधिकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे खडपकर समर्थक नागरिक गुरुवारी घडलेल्या एकूण वादविवादाच्या बाबतीत गप्प बसले आहेत. नगराध्यक्ष श्री. राऊत यांनी एकवीस जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे.

गावच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा : भावे

संबंधित बातम्या