बायणा उड्डणापुलाची मुख्यमंत्र्यांद्वारे पाहणी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

वरूणापुरी - सडा महामार्ग काम लवकरच पूर्णत्वास

डॉ. प्रमोद सावंत यांची ग्‍वाही : मुरगाव मतदारसंघातील विकासकामांचा आढावा

उड्डाण पुलाची तसेच बायणा समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरण करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत नगरविकासमंत्री मिलिंद नाईक व मान्‍यवर

दाबोळी : वरूणापुरी जंक्‍शन ते सडा राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास आणले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मुरगाव मतदारसंघाचा दौरा करून मुरगावातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरूणापुरी जंक्‍शन ते हेडलॅण्ड सडा राष्ट्रीय महामार्गाचे काम काही कामांसाठी रेंगाळत राहिले असल्‍याचे सांगितले. ते म्‍हणाले की, हा वास्‍को व मुरगाव मतदारसंघासाठी महत्त्‍वाचा प्रकल्प आहे. २०१५ साली सुरू झालेला हा प्रकल्प मध्यंतरी एमपीटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य सरकार यांच्यामधील खार्चाच्या विभागणीवरून खंडीत झाला होता. या कामाचा आतापर्यंतचा आढावा घेण्यासाठी आज मुरगाव मतदारसंघाला भेट देऊन कामाला गीत देण्यास सांगितले आहे. तसेच वास्कोहून बायणा येथे पुलावरून जाण्यासाठीचा महाराजा हॉटेलकडील अपररॅम्प तसेच बायणा येथील डावन रॅम्पचे काम वाहतूक रहदारीसाठी अडचण होऊ नये याची काळजी घेऊन हे काम लवकरच सुरू करण्‍यात येणार आहे. मधोमध केबल स्टेड ब्रीजचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्‍यातील हा उत्कृष्ट प्रकल्प म्हणून गणला जाईल. प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास आणला जाईल. या प्रकल्पामुळे वास्को शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. या प्रकल्पाबरोबर वास्को शहर व मुरगाव मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणात भर पडेल. या सर्व कामांबरोबर वरूणापुरी येथील उड्डाण पुलाच्या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे.

आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी वरूणापुरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली. नंतर त्यांनी बायणा येथे बायणा समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाची पाहणी करून येथील गॅमन इंडिया लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्प कार्यालयात जाऊन बैठक घेतली व कामाविषयी आढावा घेतला. यावेळी गॅनन इंडिया प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रोजॅक्‍टरद्वारे राष्ट्रीय महामार्गाच्या व उड्डाणपुलाच्या कामाविषयी मुख्यमंत्र्याना माहिती दिली. नंतर मुख्यमंत्र्यांनी हेडलॅण्ड सडा, बोगदा आदी ठिकाणी विकासकामांची पाहणी केली.

तसेच गेल्या आठवड्यात हेडलॅण्ड सडा येथे सुरू केलेल्या कचरा प्रकल्पाला भेट दिली व कचरा प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. शेवटी त्यांनी मुरगाव हार्बर येथे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मनसुख मांदविया यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आलेल्या मुरगाब बंदरातील क्रुझ टर्मिनल इमिग्रेशन सेवेची पाहणी केली. आज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, गॅमन इंडिया कंपनीचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी, नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी बायणा येथे गॅमन इंडिया कार्यालयात बैठकीत आपली उपस्थिती दर्शविली.

 

 

अबब :नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली झर

संबंधित बातम्या