इतिहास घडला म्हणूनच आमचे अस्तित्व जीवंत:अवधूत कामत  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

वाळपई:धावे-सत्तरी येथे कलाकारांच्या सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन

वाळपई:धावे-सत्तरी येथे कलाकारांच्या सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन
आपली भारतभूमी ही मातेच्या रूपाने अधिस्तान करून आहे, अशा पवित्र भारत भूमीत देवतांचे वास्तव्य कायमचे बनले आहे. या देशात अनेकांना परमेश्वराच्या अस्तित्वाचे अनुभव आले आहेत.म्हणूनच बाहेरील देशातील लोकही आमच्या भारत मातेला मानत आहेत.आपल्या देशावर अनेकांनी आक्रमणे केलीत.त्याला प्रत्येकवेळी आपल्या शूरवीरांनी सामना करीत शत्रूंना पळवून लाविले.या शूरवीरांनी इतिहास निर्माण केला म्हणूनच आज आमचे अस्तित्व जिवंत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक अवधूत कामत यांनी केले आहे.धावे-सत्तरी येथील श्री शांतादुर्गा मंदिराच्या सभामंडपात 'भारत माता की जय' सत्तरी तालुक्यातर्फे आयोजित कलाकारांच्या सत्कार कार्यक्रमात कामत बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे नारायणबुवा बर्वे, दामोदर बर्वे, भारत माता की जय चे पदाधिकारी रमेश गावस, मंगेश माईणकर, गणेश माटणेकर यांची उपस्थिती होती.
कामत म्हणाले,या भारतभूमीसाठी क्रांतिवीरांनी प्राण अर्पण केले आहेत. त्याची आठवण कायम ठेवली पाहिजे.त्यांनी अगदी साधी राहणीमान ठेवून देशासाठी आपला देह समर्पण केला होता.वंदेमातरम् मध्ये भारतमातेचे मोठे वर्णन केले आहे. देवांनी, कवींनी, लेखकांनी भारतमातेचे वर्णन केले आहे.ही तपोभूमी आहे. येथे परमेश्वरांचा साक्षात्कार होत असतो.म्हादई नदीवर संकट गडद झाले आहे.प्रत्येकवेळी सरकारची जबाबदारी म्हणून चालणार नाही.तर लोकांचा उठावही गरजेचा आहे.कारण ती देखील सामाजिक बांधीलकी आहे.नारायणबुवा बर्वे म्हणाले सत्कार हे प्रोत्साहन देणारे उपक्रम असून त्यातून नवकलाकार घडत असतो. समाजाला कलाकार व विचारवंत फार आवश्यक आहे. १४ विद्या व ६४ कला आहेत.त्यातील एक तरी कला विद्या आत्मसात केली पाहिजे.विद्यादान हे श्रेष्ठ काम आहे असे बर्वे म्हणाले.यावेळी विविध क्षेत्रातील कलाकार लक्ष्मी बोट्टरकर, द्रौपदी तळपी, सुमन वेळूस्कर, सुभद्रा कुडचिरकर, विष्णू गावकर, नारायण पर्येकर, अंकुश ओझरेकर, नारायण गावकर, नारायण गुरव, अभिमन्यू ओझरेकर, निलेश गावकर, राम ओझरेकर, गोविंद हरवळकर, पलक पर्येकर, गोविंद बर्वे, आर्या जोशी, गीता वझे, प्रविण मराठे, श्रीधर भावे, नारायण बर्वे यांचा शाल, श्रीफळ, भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.श्रीधर भावे यांनी विचार व्यक्त केले. गणेश माटणेकर व भालचंद्र भाटेकर यांनी सुत्रनिवेदन केले.आभार गणेश माटणेकर तर चैताली माटणेकर, नमिता मांद्रेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केली.मेघा गावकर हिने देशभक्तिपर गीत सादर केले. सरकारी प्राथमिक शाळा धावेच्या मुलांनी स्वागत गीत सादर केले.गणेश माटणेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.सर्वांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.

म्हादई कलश पूजन
राज्यात २ फेब्रुवारी पासून म्हादई नदीचे पूजन हा उपक्रम राबविला जाणार आहे.खांडेपार येथे उपक्रमाला सुरुवात होणार असून तीनशे कलश पूजन केले जाणार आहे.खांडेपार येथे कलश पूजन करून नंतर प्रत्येक तालुक्यात पूजनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी पणजी येथे मांडवीत या पाण्याचे विसर्जन केले जाणार आहे. यात १०८ दाम्पत्य सहभागी होणार आहेत.
 

जलप्रवास करण्यासाठी जेटींच्या बांधकामास प्रयत्नशील

संबंधित बातम्या