अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचा मेळावा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

सरकारी कंपन्‍यांच्‍या खासगीकरणाचे प्रयत्‍न : डॉ. भालचंद्र कांगो

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसन्न उटगी, सुहास नाईक, राजू मंगेशकर आणि इतर पदाधिकारी उपस्‍थित होते.

पर्वरी : रेल्वे, भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, दूरसंचार सारख्या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला आहे. ही सरकारची नीती कामगारांविरुद्ध आहे. म्हणून आपल्याला संघटित होऊन याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. शेअर मार्केट कोलमडले आहे. कामगारांचा जमलेला भविष्यनिधी फंडही आगामी धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशा विविध पैलूंवर राष्ट्रीय आयटक नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रकाश टाकला.

डॉ. भालचंद्र कांगो म्‍हणाले की, जनतेत जात-धर्माच्या नावावर फूट पाडणे, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काश्मीरमधील ३७० कलम हटविणे, राष्ट्रीय सुरक्षा कायदा  (सीएए ) लागू करणे यासारखे विषय आणले जात आहेत. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास पूर्णतः गमावला असून लोकांची दिशाभूल करण्याचा डाव आखला जात आहे. नोटबंदी (एका रात्रीत) करून जनतेला रांगेत उभे करण्यात आले, त्यात १५४ जणांचा मृत्यू झाला. बेकारी वाढली, काळा पैसा आला नाही, याचे उत्तर सरकारला देणे क्रमप्राप्त आहे. पुंजीपतींना सरकार सहाय्य करीत आहे. म्हणूनच ललित मोदी, निरव मोदी, मेहुल चोकसीसारखे उद्योगपती देश सोडून परदेशात पलायन करीत आहेत. आज बँकेत कष्टाचे पैसे जमा करणे, गुंतवणूक करणे धोक्याचे बनले आहे आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे.

सीएए कायदा आणून जाती, धर्माचे तुष्टीकरण चालले आहे. गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडला आहे, कामगारांना पुरेसे काम मिळत नाही, पर्यावरण राखून सरकारने खाण व्यवसाय सांभाळायला पाहिजे. ते जगण्याचे साधन बनले आहे परंतु सरकार याबाबतीत सपशेल अपयशी ठरले आहे, असे ते पुढे म्हणाले. 

प्रारंभी ध्वजारोहणाने आणि मशाल प्रज्वलनाने मेळाव्याची सुरवात झाली. प्रसन्न उटगी यांनी प्रास्ताविक केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, गिरीश कर्नाड, डॉ. श्रीराम लागू तसेच अनेक कॉम्रेड दिवंगताना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कामगारांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा द्यावयास हवा, असे आवाहन केले.

उपस्थितांपैकी अनेकांनी विचार मांडले. यावेळी काही महत्त्‍वाचे ठराव मांडण्यात आले. त्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा मागे घेणे, सरकारी नोकरांना लागू होणारी नवीन  पेंशन योजना मागे घेणे, कामगारांच्या सुरक्षेविषयी योग्य धोरण अवलंबिणे, सरकारी खात्याचे खासगीकरण थांबवावे, खाण व्यवसाय चालू ठेवण्यासाठी गोवा मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापून योग्य कारवाई करणे, भाववाढ रोखणे, कामगारांना योग्य रोजगार वेतन मिळावे, कंत्राट पद्धती नष्ट करून खासगी आणि सरकारी नोकरी कायम करणे, औद्योगिक पॉलिसी योग्यप्रकारे हाताळून अधिकाधिक नोकऱ्या प्राप्त कराव्या, कामगारांवर होणारे हल्ले रोखावे, वाढता भ्रष्‍टाचार रोखावा असे ठराव मंजूर करण्यात आले. 

मेळाव्याचे सूत्रसंचालन राजू मंगेशकर यांनी केले. यावेळी गोव्यातील सर्व भागातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

यांनी केला पुण्याचा दौरा

संबंधित बातम्या