जनतेचे आरोग्य महत्वाचे :आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या फळविक्रेत्यांची गय नाही : आरोग्यमंत्री

म्हापसा येथील महारुद्र मंदिराच्या परिसरात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कॅफे तुलसीच्या उद्‌घाटन सोहळ्यास ते आले होते. उद्‌घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांनी एफडीआयने घातलेल्या धाडींसंदर्भात त्यांना छेडले असता त्यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला. असे अवैध व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

म्हापसा : गोव्यात हल्ली कृत्रिम पद्धतीने फळे पिकवून विक्री केली जाते. असे प्रकार लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याने जनतेच्या आरोग्याशी खेळू पाहणाऱ्या फळविक्रेत्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिला.

आरोग्यविषयक प्रश्‍नांसंदर्भात आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे पुढे म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात असलेल्या जास्तीत जास्त सुविधा म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात असायलाच हव्या. ग्रामीण भागांतून येणाऱ्या रुग्णांना आवश्‍यक आपत्कालीन सेवा मिळून त्यांच्यावर यथायोग्य वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असते. गोव्याबाहेरील माझ्या एका मित्राला हृदयविकाराचा धक्‍का बसला असता आज म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर पुरेसे वैद्यकीय उपचार होऊ शकले नसल्याने त्याचे निधन झाले, ही वस्तुस्थिती आहे.

गोवाभरातील इस्पितळांच्या कॅज्युअल्टी विभागात विविध सेवासुविधांचे निर्माण करणे, डॉक्‍टरांच्या पुरेशी संख्या असणे या काही महत्त्वपूर्ण गरजा बनून राहिल्या आहेत. प्रशासनात पी.पी.पी. पद्धतीचा वापर केल्यास या समस्या सुटू शकतात. परंतु, हा प्रकार जनतेला मान्य नसल्याने सरकारसमोरही काही मर्यादा आहेत, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सर्व प्रकारची औषधे उपलब्ध नाहीत असा काही जणांकडून चुकीचा आरोप केला जात आहे; त्या इस्पितळात येणाऱ्या सर्व रुग्णांवर औषधोपचार केले जात असल्याचेही ते म्हणाले.

 

विविध ठिकाणी ‘म्हादई’ कलशाचे पूजन

संबंधित बातम्या