रेल्वे सरव्यवस्थापकाची अपमानप्रकरणी माफी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

त्या रेल्वे अधिकाऱ्याने मागितली माफी  

आमदार साल्ढानांच्‍या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

यावेळी सरव्यवस्थापक व अजय कुमार सिंग यांनी माफी मागत असल्याचे तसेच केलेले वक्तव्य मागे घेत असल्याचे आमदार एलिना साल्ढाना यांच्या उपस्थितीत सोशल मीडियासमोर बोलताना मत व्यक्त केले.

पणजी: वास्को येथे दक्षिण - पश्‍चिम रेल्वे विभागाचे सरव्यवस्थापक अजय कुमार सिंग यांनी कुठ्ठाळ्ळीच्या आमदार एलिना साल्ढाना व त्यांच्यासोबत असलेल्या गोमंतकियांचा ‘तुम्ही पोर्तुगीज’ असा उल्लेख करून केलेल्या अपमानप्रकरणी आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत त्यांनी आमदाराची व बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना गोमंतकियांची जाहीर माफी मागितली.

आमदार एलिना साल्ढाना यांचा तसेच त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचा रेल्वेचे सरव्यवस्थापक अजय कुमार सिंग यांनी जो अपमान केला त्याचा राजकीय विरोधकांनी निषेध केला होता.आमदार साल्ढाना यांनीही ही बाब मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडली होती. गोमंतकियांचा अपमान करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.आज त्यांनी रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्यासह सरव्यवस्थापक अजय कुमार सिंग, आमदार एलिना साल्ढाना तसेच अपमान केलेल्या लोकांसमवेत आल्तिनो - पणजी येथील शासकीय बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत सिंग यांनी माफी मागितली, अशी माहिती आमदार साल्ढाना यांनी दिली.

याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, ज्या रेल्वे अधिकाऱ्याने गोमंतकियांना अपमानित केले होते त्याला बोलावून घेण्यात आले होते. त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी व दिलगिरी व्यक्त केली आहे.आमदार व लोकांना ‘तुम्ही पोर्तुगीज’ असे या रेल्वे अधिकाऱ्याने संबोधल्यानंतर रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून चर्चा केली व त्या अधिकाऱ्याला माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव हे उपस्थित राहिले.गोमंतकियांशी असभ्य वर्तन करणारे अधिकारी येथे नकोत, अशी मागणी आमदार साल्ढाना यांनी केली. त्याबाबतही यादव यांना विचार करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

या बैठकीनंतर जाहीरपणे माफी मागण्याचे आश्‍वासन रेल्वे सरव्यवस्थापक अजय कुमार सिंग यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक संपल्यानंतर ते थेट निघून गेले. ही बाब आमदार साल्ढाना यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली. मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्याला त्वरित आपल्या शासकीय बंगल्यावर बोलावून घेतले. त्यानंतर आमदार साल्ढाना यांच्या उपस्थितीत रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितले की, कधी कधी माणसाच्या हातून चुका होत असतात. गोमंतकियांचा अपमान करण्याचा कोणताच हेतू त्यामागे नव्हता. सिंग यांच्याकडून जी चूक झाली त्यासाठी त्यांनी माफी व दिलगिरी मुख्यमंत्र्यांकडे व आमदारांकडे व्यक्त केली आहे. गोव्यात रेल्वेच्या विकासकामांबाबत कोणतीच ढिलाई होणार नाही.

साकोर्डा येथे गॅस जोडणीचे वितरण

संबंधित बातम्या