वेतनावरून अस्वस्थता वाढली; शुक्रवारी व्यवस्थापनाशी बैठक

SEZA workers meet CM again
SEZA workers meet CM again

डिचोली : वेतन आणि थकबाकीच्या मागणी संदर्भात अद्याप तोडगा निघाला नसल्याने डिचोलीतील सेझा (वेदांता) कामगारांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एकाबाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कामगारांना आशादायक आश्वासन मिळाले आहे. तर दुसऱ्याबाजूने येत्या शुक्रवारी (ता. 21) सकाळी सेझा कामगार संघटनेची पणजी येथे कंपनी व्यवस्थापनाशी बैठक होणार आहे.

कामगारांनी आपला आंदोलनाचा निर्णय अद्यापही स्थगित ठेवला असून, शुक्रवारच्या बैठकीत निर्णायक तोडगा निघाला नाही, तर नंतर आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असे सेझा कामगार संघटनेचे नीलेश कारबोटकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, सेझा कामगारांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डिचोलीत आले असता, कायदा सल्लागार अजय प्रभुगावकर आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे इंद्रकांत फाळकर, दीपक पोपकर आदी अस्वस्थ कामगारांनी मुख्यमंत्र्यांची काही क्षणापुरती भेट घेतली. कामगारांच्या भावनांची आपल्याला जाणीव असून, या प्रश्‍नी जरा धीर धरा, असे मुख्यमंत्र्यांनी या कामगारांना सांगितले. यावेळी स्थानिक आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर आणि सार्वजनिक बांधका खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर उपस्थित होते.

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा भेट...
वेतन आणि थकबाकीच्या मुद्यावरुन आंदोलन करण्याचा पवित्रा सेझा कामगारांनी गेल्या ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत घेतल्यानंतर, त्याचदिवशी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे शासकीय निवासस्थानी कामगारांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. वेतन प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाच्या वरिष्ठांशी बोलणी करण्याचे तसेच खाण प्रश्‍नी न्यायालयातील ऍबोलिशन ऍक्‍ट संदर्भातील याचिकेवरील सुनावणीपर्यंत कळ सोसा, असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले होते. सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाचा विचार करण्याचेही कामगारांनी ठरवले होते. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या अस्वस्थ कामगारांनी (सोमवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा भेट घेवून आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com