शिरगाववासीयांनी खनिज वाहतूक रोखली

stop trasnsportstion
stop trasnsportstion

डिचोली:पैरा शिरगावच्या नागरिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखून धरली.

पाणी बिले भरण्याची मागणी; उपजिल्हाधिकाऱ्यांचे तोडगा काढण्याचे आश्वासन
पैरा येथील चौगुले खाणीवरील ई-लिलाव खनिज वाहतूक सुरू झाल्यापासून या वाहतुकीला एकापाठोपाठ एक ग्रहण लागत आहे. थकीत असलेली पाण्याची बिले अगोदर भरणा करा आणि नंतरच खनिज वाहतूक सुरू करा, अशी मागणी करीत शिरगावच्या नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत पैरा येथे खनिज वाहतूक रोखली.स्थानिक पंचायतीच्या पाठिंब्याने शिरगावमधील जवळपास शंभर लोकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे दिवसभर खनिज वाहतूक बंद ठेवावी लागली.दरम्यान, दुपारी झालेल्या बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टाई करून लोकांची समस्या सोडवण्याचे समाधानकारक आश्वासन दिल्यानंतर शिरगावचे लोक शांत झाले आणि त्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला.त्यामुळे आज दिवसभर बंद असलेली खनिज वाहतूक उद्यापासून सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनीही तसे स्पष्ट केले आहे.
शिरगाव भागातील जलस्त्रोतांवर परिणाम झाल्याने या गावातील घरांना नळजोडण्या देवून पाण्याची बिले चौगुले, बांदेकर आणि सेझा खाण कंपन्यांकडून भरण्यात येत आहेत.मात्र, खाणीं बंद झाल्यापासून जवळपास दोन वर्षे होत आली, संबंधित खाण कंपन्यांनी पाण्याची बिले भरलेली नाहीत.त्यामुळे बिलांची थकीत रक्‍कम भरणा करा, अन्यथा नळजोडण्या तोडण्यात येतील अशी नोटीस पाणीपुरवठा खात्याने नारिकांना दिली आहे. थकीत रकमेचा आकडा १९ लाखांच्या घरात असल्याचे समजते.या नोटीसीमुळे स्थानिक अस्वस्थ तेवढेच आक्रमक बनले आणि सोमवारी सकाळी त्यांनी रस्त्यावर उतरून पैरा-शिरगाव जंक्‍शनवर खनिज वाहतूक रोखून धरली. आंदोलनकर्त्यांत महिलांचाही समावेश होता.
आंदोलनकर्त्यांना स्थानिक पंचायतीचा पाठिंबा होता. सरपंच सदानंद गावकर आणि उपसरपंच विजया मांद्रेकर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. गेल्या अकरा वर्षांपासून खाण कंपन्या पाणी बिले भरीत आल्या आहेत.मात्र, आता खाणबंदीचे निमित्त करून पाणी बिले भरण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच सदानंद गावकर यांनी दिली. हा विषय उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. नागरिक सकारात्मक तोडग्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.नळजोडण्या तोडल्या, तर आम्ही पाणी कोठून आणायचे.असा प्रश्‍न उपसरपंच विजया मांद्रेकर यांनी उपस्थित केला.
आंदोलनाची माहिती मिळताच डिचोलीचे पोलिस निरीक्षक संजय दळवी पोलिस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले.त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, आंदोलन करणारे नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.पाणी बिलांच्या मुद्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक करण्यास देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक
पाणी बिलांच्या या मुद्यावर दुपारी डिचोली येथे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्यासमवेत शिरगावचे नागरिक, पंचायत आणि खाण कंपनीचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक झाली.या बैठकीस सरपंच सदानंद गावकर, उपसरपंच विजया मांद्रेकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याप्रश्‍नी सुवर्णमध्य काढण्यात येईल. तोपर्यंत नळजोडण्यात तोडण्यात येणार नाहीत, असे आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले.त्यानंतर नागरिकांनी आंदौलनाचा पवित्रा मागे घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com