विदेशातील गोमंतकीयांना नातेवाईकांचा घोर!

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

गोव्यात अनेक कुटुंबे अशी आहेत की, त्यातील बहुतेक लोक कामानिमित्त विदेशात आहेत. अशा कुटुंबातील ज्‍येेष्ठ नागरिकांची परवड होऊ लागली आहे. त्यांची लसीकरणासाठी जाण्याच्या बाबतीत जशी अडचण होत आहे,

पणजी: राज्यातील(Goa) कोरोनाच्या(Covid-19) वाढत्या फैलावाने सर्वांनाच अडचणीत आणले असले, तरी ज्येष्ठ नागरिकांना(Citizen) आणि त्यातही खास करून एकटे राहणाऱ्या वृद्धांना या महामारीने जास्त गोत्यात आणले आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या विदेशात(foreign country) असलेल्या नातेवाईकांना गोव्यातील बिघडत्या परिस्थितीची समाजमाध्यमे व इतर मार्गांनी माहिती मिळत असल्याने त्यांना आपल्या आप्तेष्टांची चिंता दिवसेंदिवस जास्तच सतावू लागली आहे.

गोव्यात अनेक कुटुंबे अशी आहेत की, त्यातील बहुतेक लोक कामानिमित्त विदेशात आहेत. अशा कुटुंबातील ज्‍येेष्ठ नागरिकांची परवड होऊ लागली आहे. त्यांची लसीकरणासाठी जाण्याच्या बाबतीत जशी अडचण होत आहे, त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे कठीण होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे विदेशात राहणारे त्यांचे नातेवाईक घाबरून जाऊ लागले असून त्यातून स्वयंसेवकांच्या गटांशी संपर्क साधण्याचे आणि समाजमाध्यमांवरून मदतीसाठी आवाहने करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोरोना संसर्गाचे तीव्र परिणाम भोगावे लागण्याच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका आहे. त्याशिवाय विलगीकरण पाळणे वा मानसिक आरोग्य सांभाळणे ही आव्हाने हाताळणे‌ त्यांना जड जात आहे. 

महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर तौकते चक्रीवादळाची शक्यता 

कोरोनाबाधितांच्‍या समस्‍येत वाढ
मोठी चिंताजनक बाब म्हणजे अशा ज्येष्ठ नागरिकांना जरी लक्षणे आधीच जाणवून आली, तरी कोरोना चाचणीसाठी त्यांना तत्परतेने धाव घेता येत नाही. कारण त्यांना चाचणीसाठी जाण्याकरिता कुणाच्या तरी मदतीची गरज असते आणि कुटुंबातील सदस्य जवळ नसल्याने त्यांची याबाबतीत आबाळ होते. यामुळे त्यांना उपचार उशिरा मिळत असल्याचे दिसून येत आहे.‌ स्वयंसेवकांचे गट आणि बिगरसरकारी संघटना यांना त्यांच्याविषयी माहिती मिळेपर्यंत या ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनविषयक समस्या वाढीस लागलेल्या असतात आणि त्यांना इस्पितळात दाखल करण्याची गरज निर्माण झालेली असते, असेही दिसून येत आहे.

इतरांवर राहावे लागते अवलंबून
कोरोना महामारीच्या काळात मदत करण्यात गुंतलेल्या काही स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी असे अनेक ज्येष्ठ नागरिक इस्पितळांत पाहिलेले आहेत की, ज्यांच्या सोबतीला काळजी घेणारे कोणीच नाही. काही वेळा कुटुंबातील सर्व सदस्य बाधित झाल्यामुळे ही परिस्थिती येत असते. अशा वृद्धांना केवळ इस्पितळात दाखल होण्याच्या बाबतीतच नव्हे, तर घरी परतण्याची वेळ आल्यावरही अडचण भासत असते. कारण 108 सेवेच्या रुग्णवाहिका रुग्णांना परत घरी नेऊन सोडत नसतात. त्यामुळे अनेकदा या वृद्धांना दयाभावनेने मदत करणाऱ्या लोकांवर अवलंबून राहावे लागते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणेंच्या वादाची चर्चा सर्वत्र 

एकटे असल्‍याने मृत्‍यूची भीती सतावतेय!
बाहेर फिरणे टाळून घरीच राहणे, मित्र आणि कुटुंबातील इतरांशी जवळून संपर्क येणार नाही, याची काळजी घेणे तसेच आजार आणि मृत्यूच्या विचाराने भेडसावणारी ‘अँग्झायटी’ यांना सामोरे जाणेही ज्येष्ठ नागरिकांना कठीण जात असून त्याकडे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे विदेशात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना असाहाय्य वाटू लागलेले असून आपल्या वयोवृद्ध पालकांविषयी त्यांना वाटणारी चिंता वाढत चालली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात गुंतलेल्या स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हाॅट्सॲपवर दरदिवशी आखाती देश, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपच्या इतर देशांतून अनेक कॉल्स येऊ लागलेले आहेत. गोव्यात एकटे राहणाऱ्या आणि कोरोनाबाधित झालेल्या आपल्या आप्तेष्टांना मदत करावी यासाठी हे कॉल्स येत असतात, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या