गोव्यातील 8 तालूक्यात सूरू होणार कोरोना भरतीपूर्व हॉस्पिटल्स

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

कोविडची लक्षणे असल्यावरही अनेकजण आजार अंगावर काढतात.

पणजी:  कोविडची लक्षणे (Corona) असल्यावरही अनेकजण आजार अंगावर काढतात. अखेरच्या क्षणी गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल किंवा अन्य सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास ऐनवेळी येतात. त्यांना वैद्यकीय प्राणवायूची (Oxygen) गरज भासते. हे टाळण्यासाठी सरकारने आता पेडणे (Pedne), डिचोली (Dicholi), वाळपई (Valpoi), काणकोण (Kankon) व कुडचडे येथे कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल सुरु करण्याचे ठरवले आहे. बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे तत्काळ तसेच चिखली (Chikhali) व कासावली (Kasavali) येथे उद्यापर्यंत अशी हॉस्पिटल्स सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी आज दिले. (Corona pre-recruitment hospitals will start soon)

हॉस्पिसिओच्या डॉ. वेंकटेश यांचा व्हॉट्सॲप व्हिडिओ व्हायरल
 
परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामाजिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण दवाखान्यांतील डॉक्टर्स, परिचारिका या हॉस्पिटल्समध्ये सेवा बजावणार आहेत. एकूणच युद्धपातळीवर कोविड प्रतिबंधासाठी हालचाली मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरातील आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव परीमल राय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. जुझे डिसा, राज्याचे आरोग्य सचिव, गोमेकॉचे सल्लागार, मुख्य वैद्यकीय अधिकारी आदी सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, रुग्ण अखेरच्या क्षणी हॉस्पिटल्सच्या दारात येत असल्याने त्याचा वाचविण्याची शिकस्त करावी लागते, कधी कधी वाचवता येत नाही. अनेकजण अखेरच्या क्षणी हॉस्पिटल्समध्ये हलवतानाच वाटेतच प्राण सोडतात. ही सारी परिस्थिती पालटवण्यासाठी कोविड निगा केंद्रांच्या धर्तीवर, पण पूर्ण उपचार करणारी हॉस्पिटल्स तात्पुरत्या स्वरूपात राज्यभरात सुरु करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जागांचा शोध संबंधित जिल्हाधिकारी आजच्या आज घेणार आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर सध्या कोविड निगा केंद्र आहे. तेथे आता हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. वैद्यकीय प्राणवायू वगळता तेथे इतर उपचार करता येणार आहेत. एखाद्या रुग्णाला वैद्यकीय प्राणवायूची गरज भासल्यास त्याला तातडीने गोमेकॉत हलवता येणार आहे. मी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना तेथे आताच सारी व्यवस्था करा, सकाळपर्यंत इस्पितळ सुरु करा, अशी सूचना केली आहे. त्यांनी आतापर्यंत तयारीही सुरु केली असेल.

आरोग्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या वादाचा गोवा आरोग्य सेवेला फटका

पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण, कुडचडे या ठिकणी कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल्स सुरू करण्यात येणार असून तत्काळ शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उद्यापर्यंत कासावली, चिखली या ठिकाणीही हॉस्पिटल्स सुरू होतील. तसेच पूर्ण उपचार करणारी तात्पुरत्या स्वरूपात राज्यभर हॉस्पिटल्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

रूग्णांच्या परिसरात सुविधा
आजवर केवळ ठराविक हॉस्पिटलमध्येच कोविडचे उपचार केले जात होते, आता त्याचे विकेंद्रीकरण केले जात आहे. रुग्णांच्या परिसरातच उपचार सुविधा उपलब्ध झाली, तर ते घरात न थांबता अशा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातील अशी अपेक्षा आहे. कोविड चाचणी केल्यानंतर गृह अलगीकरणाता राहणाऱ्यांवर वैद्यकीय दृष्टिकोनातून लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसित केली जात आहे. त्यातून अखेरच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये मला वाचवा, म्हणून धाव घेणाऱ्यांचे प्रमाण घटवून योग्य वेळी इस्पितळात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

बालरथांचा वापर करा
प्रत्येक भागात अशी हॉस्पिटल्स सुरू करावी लागतील. शेजारील आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स तेथे प्राणवायूची गरज नसलेल्या रुग्णांवर उपचार सुरु करतील. रुग्णांना प्राणवायूसाठी नजीकच्या हॉस्पिटल्समध्ये हलविण्याची वेळ येईल, तेव्हा गरजेनुसार बालरथांचाही वापर करा, अशी सूचना करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सारी व्यवस्था करण्याची सूचना याआधीच दिली आहे. आरोग्याधिकाऱ्यांना सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.

10 मेपर्यंत निर्बंध
जीवनासाठी आवश्यक वस्तूंची विक्री न करणारी सर्व दुकाने व आस्थापनांने 10 मे पर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी उशिरा तसे आदेश जारी केले. साप्ताहिक बाजारही बंद करण्यात आले आहेत. पूर्वी 50 टक्के उपस्थितीने हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरु ठेवता येत होती आता तीही बंद करण्यात आली आहेत. हॉटेल्सची स्वयंपाकघरे पार्सल देण्यासाठी चालवता येणार आहेत.

संबंधित बातम्या