गोमंतकीयांच्या दारी दंतचिकित्सकांची गाडी

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने दंत विकारावर उपचार करणारे फिरते वाहन सुरू केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज दिली. 

पणजी: गोवा राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिक त्यांच्या दातांच्या समस्या प्राथमिक स्तरावर असताना सोडवण्यासाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. दातांचे दुखणे तसेच घेऊन ते कायम राहतात आणि त्यानंतर पुढे त्यांना दातांच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने दंत विकारावर उपचार करणारे फिरते वाहन सुरू केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज दिली. 

100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचा दावा खोटा; पीआयबीने दिलं स्पष्टीकरण -

बांबोळी येथील दंत महाविद्यालयाच्या आवारात आज आरोग्यमंत्री राणे यांनी दंत विकारावरील उपचाराच्या फिरत्या वाहनाचे उद्‍घाटन केले. यावेळी दंत महाविद्यालय विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता, इतर डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी विश्‍वजित राणे यांनी सांगितले, की राज्यातील गरीबांपर्यंत आरोग्य सुविधा व उपचार पोहोचवण्यासाठी आरोग्य खाते सक्षम आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. यापूर्वी २ मोबाइल बसगाड्या फिरत्या उपचारासाठी आपण खरेदी केल्या होत्या. ३० हजार लोकांवर त्यावेळी उपचार केले गेले. मात्र, त्यानंतर त्याचा वापर झाला नाही. आता राज्यातील नागरिकांच्या दंत विकारावर उपचार करण्यासाठी फिरते वाहन उपलब्ध करण्यात आलेले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने हे वाहन दरमहा सहा ते दहा ठिकाणी जाऊन तेथे दंत विकारावर उपचार शिबिर घेणार आहे.

गोव्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट -

दंत विकार तपासून त्यानंतर त्यावर उपचारही तेथेच केले जाणार आहेत. गरज पडल्यास पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिकांना येण्यास सांगण्यात येणार आहे. या वाहनाचा लाभ गावातील अनेक नागरिकांना होणार आहे. जे दंत  विकाराकडे दुर्लक्ष करून तसेच राहतात आणि नंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना या वाहनामुळे दिलासा मिळणार आहे.सरकारच्या माध्यमातून १०८ रुग्णवाहिका असो किंवा गरोदर महिलांसाठीच्या आणि हृदयविकारासाठीच्या रुग्णवाहिका असोत. विविध उपक्रम आपले सरकार तथा आरोग्य खाते राबवत असून यापुढेही विविध माध्यमांतून गरीबांपर्यंत सर्वप्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी शेवटी सांगितले.

संबंधित बातम्या