Goa Politics: राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून राज्याची प्रतिमा मलिन

Goa Politics: राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून राज्याची प्रतिमा मलिन
Pramod Sawant

पणजी: राजकीय स्वार्थासाठी काही विरोधी राजकारण्यांकडून सोशल मीडियावर कोरोना, शिक्षण तसेच कायदा व सुव्यवस्था यासारख्या विषयावरून राज्याची प्रतिमा देशभरात मलिन करत आहेत, अशा राजकारण्यांना लोकांनी धडा शिकवायला हवा. गोवा राज्य सरकारने(Goa government) चांगले केलेले काम कधीच समाजासमोर येत नाही. राजकारण्यांनी राजकारण्यांवरच टीका करावी, खात्यावर न करण्याचा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी हाणला. (Goa Politics Opponents maligning the image of the state of Goa)

सांताक्रूझ पोलिस चौकीच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे. तसेच गुन्हेगारी तपासकामाचे प्रमाण वाढले आहे. तपास पोलिसांच्या हाती आहे. मात्र, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पोलिसांबरोबरच लोकांचेही आहे. गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांना लोकांनी त्यांची समजूत घालून समाजाने त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याची गरज आहे. हे केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण आपोआपच कमी होईल. विविध गुन्हे घडत असतात. मात्र, समाजाने मदत केली, तर हे प्रमाण आटोक्यात आणणे शक्य आहे. राज्यात पुढील सहा महिन्यात हाती घेतलेली विविध विकासकामे पूर्ण होतील. या कामांना प्राधान्य दिले जाईल.

राज्यातील कोरोना संसर्ग संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याबरोबरच लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाचे प्रमा 5 टक्क्यांपेक्षा खाली यायला हवे, मृत्‍यूचे प्रमाणही कमी व्हायला हवे व लसीकरणाचे प्रमाण वाढायला हवे. टीका उत्सव - 3 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोफत लसीकरण सुविधा सुरू करणारे गोवा राज्य हे पहिले राज्य आहे. लोकांचे सहकार्य लाभले, तर शक्य आहे. कोविड परिस्थितीचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत करण्याचा विचार आहे. राज्यातील साधनसुविधा विकासाबरोबर मनुष्य विकास करून स्वयंपूर्ण गोवा करण्याचे स्वप्न आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 

गृहआधारांना लवकरच ‘आधार’
जानेवारी 2019 पासून सरकारने 3900 लाडली लक्ष्मी लाभार्थींना लाभ दिला आहे व गृह आधार योजनेखालील लाभार्थींना गेल्या चार महिन्यापासून आर्थिक सहाय्य मिळालेले नाही त्यामुळे या महिन्यात एक महिन्याचे लाभ देण्यात येईल व उर्वरित तीन महिन्यांचे आर्थिक सहाय्य देऊन हा लाभ त्यानंतर वेळोवेळी दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या उद्‍घाटनाला सांताक्रूझचे आमदार अंतोनिओ (टोनी) फर्नांडिस, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना, महानिरीक्षक राजेश कुमार, उपमहानिरीक्षक परमादित्य, सांताक्रूझ चर्चचे धर्मगुरू रिचर्ड पिन्हेरो उपस्थित होते. आमदार फर्नांडिस यांनी सांताक्रूझ मतदारसंघामध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सुमारे 60 कोटींची कामे मंजूर झाली आहे. व्हडलेभाट येथे पंपिंग स्टेशन तसेच चिंबल येथे भूमिगत वीज वाहिन्या घालणे लवकरच सुरू केले जाईल, असे सांगितले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com