‘जीपीएससी’ च्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

गोवा लोकसेवा आयोगाकडून कनिष्ठ पातळीवरील सरकारी अधिकारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारीत परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण होण्याचे आणि फेरपरीक्षेसाठी पात्र ठरण्याचे प्रमाण वाढले आहे.

पणजी: गोवा लोकसेवा आयोगाकडून कनिष्ठ पातळीवरील सरकारी अधिकारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारीत परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण होण्याचे आणि फेरपरीक्षेसाठी पात्र ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षात अनेक प्रयत्न करून आयोग कनिष्ठ अधिकारी पदाची केवळ ९ पदेच भरू शकला होता.

आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अधिकारी पदाची २२ पदे भरण्यासाठी जाहिरात दिल्यानंतर ३ हजार ७०० जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी २ हजार ७२३ जणांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. कोविड टाळेबंदीमुळे ही परीक्षा मार्चमध्ये घेता आली नव्हती त्यामुळे आता घेण्यात आली. या परीक्षेत ७९ उत्तीर्ण झाले. त्‍याशिवाय तीन गुण कमी पडलेले ९६ जण फेर परीक्षेसाठी पात्र ठरले असून ती परीक्षा १३ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

इतिहास, प्रशासन, पर्यावरण, नाविन्‍य, चालू घडामोडी, भूगोल, तर्क आणि इंग्रजी कौशल्य आदींवर आधारीत ही ७५ गुणांची, ७५ मिनिटांची परीक्षा असते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना त्‍यांनंतर २५० गुणांच्या चार प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत. त्यात उत्तीर्ण होणारे मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत.  आज एक फेरपरीक्षा घेण्यात आली होती त्यात १६ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सर्वसाधारण गटातील १२ तर ४ जण इतर मागासवर्गीय गटातील होते.

सहायक सरकारी वकील या पदासाठी आज आयोगाने परीक्षा घेतली. २३ पदांसाठी ४५० जणांनी अर्ज केला होता. ३५२ जणांनी परीक्षा दिली त्यात २८ जण उत्तीर्ण झाले. १३ जण सर्वसाधारण गटातील, ७ जण इतर मागासवर्गीय गटातील, अनुसुचित जमाती गटातील ७ तर १ जण अनुसुचित जाती गटातील आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील पदे भरण्यासाठीच्या परीक्षेत कोणीही उत्तीर्ण झाले नाही.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या