मुबलक पशुधन असूनही राज्यात दुधाचा तुटवडा; दूध उत्पादन योजनाही फोल 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

दूध उत्पादनात राज्याला स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविण्याचा सपाटा चालविला असला तरी त्याला यश आलेले दिसत नाही. राज्यात प्रतिदिन तीन लाख लिटर दुधाचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील दुधावर अवलंबून राहावे लागत आहे.

पणजी : दूध उत्पादनात राज्याला स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविण्याचा सपाटा चालविला असला तरी त्याला यश आलेले दिसत नाही. राज्यात प्रतिदिन तीन लाख लिटर दुधाचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील दुधावर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यातल्या शहरी भागाला नेहमीच परप्रांतातील भाजीपाला आणि दुधावर अवलंबून राहावे लागते. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकार हरप्रकारे प्रयत्न करीत आहे.पण, गेल्या पाच वर्षात या योजनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, राज्यातील दुधाची मागणी अधिक अन् पुरवठा अर्ध्याहून कमी अशी स्थिती आहे. (Milk shortage in the state despite abundant livestock; Milk production plan also fall)  

गोमंतकीयांनो सावध रहा!  राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक रुग्णांची नोंद 

राज्याला प्रतिदिन 4.5 लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात राज्यात 1.25 लाख लिटर प्रतिदिन दुधाचे उत्पादन होते. त्यातही गोवा डेअरीला पुरवठा होणारे दूध 60 ते 70  हजार प्रतिदिन इतकेच आहे. त्यामुळे दररोज राज्याला साडेतीन लाख लिटर दूध परप्रांतातून आयात करावे लागते. राज्यातील दूध उत्पादन वाढावे यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. त्यात विशेषतः कामधेनू या योजनेतून स्थानिकांना गाई आणि म्हशी देण्याची योजना आहे. त्यासाठी सरकार पशुपालकांना आर्थिक पाठबळ देते. तरीही ग्रामीण भागातून या योजनेला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे अधिकारी सांगतात. एकंदर, राज्य सरकारने राज्याला दूध उत्पादनात स्वावलंबी बनविण्याचा चालविलेला प्रयत्न अपयशी ठरत आहे. 

राज्यात 48 हजार 803 गाई आणि 23  हजार 124 म्हशी आहेत. त्यातील दुभत्या जनावरांकडून 1.25  लाख लिटर इतके दूध उत्पादित होते. पण त्यातील केवळ 65 ते 70  हजार लिटर दूध गोवा डेअरीला जाते. तर उर्वरित दूध उत्पादक परस्पर विक्री करतात. राज्याची मागणी 4.5  लाख प्रतिदिन इतकी आहे. सण आणि उत्सव काळात ती ५ लाख लिटर प्रतिदिन पेक्षा अधिक असते. सरासरी साडेतीन लाख लिटर प्रतिदिन इतका तुटवडा भासत असून त्यासाठी कर्नाटकातील नंदिनी, महाराष्ट्रातील गोकूळ आणि गुजरात येथील अमूल दुधावर अवलंबून राहावे लागते. त्याशिवाय अलीकडे सहा वर्षांपासून गोव्यात सोमल दूध या कंपनीने बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. एकूणच, राज्याला दूध उत्पादनात स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न फोल ठरत आहे. 

गोवाः पालिका प्रचाराच्या तोफा थंडावल्या

काय आहे कामधेनू योजना?
या योजनेत स्व-सहाय्य संघ किंवा दूध उत्पादक संघाशी निगडित लाभार्थ्यांची निवड केली जाते.त्यांना परप्रांतातून गायी-म्हशी आणण्याची मुभा आहे. पण वाहतूक परवडत नसल्याने सरकार निविदा काढून जनावरांची खरेदी करते. वळपई येथील पशू संगोपन खात्याच्या फार्ममध्ये मेळावा भरतो, तेथे जनावरांची विक्री होते. खाते गोठा बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य करते, शिवाय 1  ते 5  जनावरांच्या खरेदीवर 75 टक्के, 6 ते 10  वर 62.5 10 ते 20 वर 50 तर 20  हुन अधिक जनावरे खरेदी करणाऱ्यांना 40  टक्के सूट दिली जाते. ही जनावरे शक्यतो तमिळनाडूतून आणली जातात. त्यांचे भाव कामधेनू समिती ठरविते, अशी माहिती पशुसंगोपन खात्याचे अतिरिक्त संचालक प्रकाश कोरगावकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली. 

श्वेत कपिला ''गोमाता''
डेअरी फार्मसाठी परराज्यातून साहिवाल, गीर आणि रेड सिंधी या गायी-म्हशींची आयात केली जाते. गोमांतकीयांची गोमाता म्हणून 3  वर्षांपूर्वी श्वेत कपिला या शुभ्र गायीची निवड झाली आहे. त्यांची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन कमाल 4  लिटर इतकी आहे. ओल्ड गोवा येथील आईसीआर म्हणजे इंडियन कौन्सिल फॉर कोस्टल रिसर्च येथे या गायी पाहायला मिळतात. मात्र, गोव्यात अद्याप या गायींना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

संबंधित बातम्या