रेल्वे विकास निगमच्या माहितीतून मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

रेल्वे विकास निगम लि.,ने दिलेल्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश झाला असल्याची टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदेश तेळेकर यांनी आज केली आहे. 

पणजी: सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीय उच्चाधिकार समितीसमोर (सीईसी) रेल्वे विकास निगम लि.,ने दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या दुपदरी मार्गाचा वापर कोळसा वाहतुकीसाठी केला जाणार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोळसा वाहतूक प्रमाण कमी करणार असल्याचे आश्‍वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. रेल्वे विकास निगम लि.,ने दिलेल्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश झाला असल्याची टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदेश तेळेकर यांनी आज केली आहे. 

गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी रेल्वे विकास निगम लिमिटेडने स्पष्ट केले की दक्षिण पश्चिम रेल्वेचा दुहेरी मार्ग कोळसा व लोह खनिज वाहतुकीसाठी आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच मुरगाव बंदरात होणारी कोळशाची वाहतूक कमी करण्यात येईल आणि रेल्वे दुपदरी मार्ग हा कोळसा वाहतुकीस नाही, असे आश्‍वासन दिले होते. रेल्वे विकास निगम लिमिटेडने डॉ. प्रमोद यांचा खोटारडेपणा उघड केला, कारण सर्वोच्च न्यायालयाला सरकारमार्फत हे स्पष्टपणे कळविण्यात आले आहे की दुहेरी मार्ग कोळसा वाहतुकीसाठी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने असे नमूद केले की यातील क्वचितच लोह खनिज आहे ज्याची या क्षणी वाहतूक केली जात आहे, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी यापुढे खोटे बोलणे थांबवावे असे आवाहन आपचे प्रवक्ते तेळेकर यांनी करून सध्या गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून उभे राहिलेल्या पर्यटन व्यवसायाला शेवटी संपवून ते टाकतील, त्यामुळे सावध राहण्याचा इशारा त्यांनी गोमंतकीयांना दिला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था नष्ट करण्यास भाजप जबाबदार असेल. कोळशाने भरलेल्या गोव्यात कोणताही पर्यटक येणार नाही आणि काही वर्षांत “हरित गोवा” हा “काळसर गोवा” मध्ये बदलला जाईल. मुख्यमंत्री पर्यटन व्यवसायाचा नाश करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजप गोव्यातील आपली सत्ता ही फक्त खोटेपणावर चालवत आली आहे. गोमंतकीय समजदार आहेत, त्यामुळे अशा खोट्या थापांना भूलणार नाही व योग्य धडा शिकवतील, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या