मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

दैनिक गोमंतक
शनिवार, 3 एप्रिल 2021

6 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या 12 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर होणारी सुनावणी या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्लीतील राजकीय बैठका भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत.

पणजी: सभापती राजेश पाटणेकर यांनी 12 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर सोमवारी ठेवलेली सुनावणी तसेच 6 तारखेला सर्वोच्च न्यायालयात या विषयावर होणारी सुनावणी या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्लीतील राजकीय बैठका भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. होय, मी काल राजकीय बैठकांना दिल्लीत उपस्थित होतो. याविषयी आणखी काही माहिती देता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचारल्यावर सांगितले. (Pramod Sawants visit to Delhi sparks political discussions)

आमदार अपात्र ठरल्यास काय? आणि अपात्र ठरले नसल्यास काय? याचे आराखडे भाजपने तयार ठेवले आहेत. त्याची कल्पना दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे किंवा संघटनसचिव सतीश धोंड नव्हते. तिन्ही नेते एकत्रित दिल्लीत गेल्यास ते माध्यमांच्या नजरेतून निसटणार नाही आणि तर्कवितर्कांना सुरवात होईल हे जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुरत दौऱ्याचे निमित्त साधत कालच दिल्ली गाठली होती.

राष्‍ट्रप्रेमाने भारावलेले वातावरण! गोवा मुख्‍यमंत्र्यांची 7.5 कि.मी. पायपीट

राजकीय चक्र गतिमान
मुख्यमंत्री या निर्णयांबाबत स्थानिक नेत्यांना कल्पना देणार आहेत. मगोतून भाजपमध्ये गेलेले मनोहर आजगावकर, दीपक प्रभू पाऊसकर हे दोन आमदार, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रांसिस सिल्वेरा, आंतोनिओ फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, क्लाफासियो डायस, इजिदोर फर्नांडिस व चंद्रकांत कवळेकर हे 10 आमदार यांच्या विरोधात अपात्रता याचिका 19 महिन्यांपूर्वीच सादर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मणिपूर प्रकरणातील निर्णय पाहता सभापती आणखी फार काळ या याचिका प्रलंबित ठेऊ शकत नाहीत. याशिवाय सभापतींनी त्वरित निर्णय द्यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांच्या याचिकांवर 6 रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी आहे. त्यामुळे अपात्रता याचिकांवर निकाल देण्याविषयी वाढता दबाव आहे. या निर्णयानंतर राजकीय चक्र गतिमान होईल, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, याविषयी पक्षाच्या वरिष्ठांनी मतप्रदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवरायांचा पुन्‍हा अवमान! ...आणि असंतोष पसरला! 

दरम्यान, याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणाले, मी काल दिल्लीत होतो हे खरे आहे. याव्यतिरीक्त आणखीन काही माहिती आताच्या घडीला जाहीरपणे देता येणार नाही.

रणनीतीबाबतही झाली चर्चा?
भाजप पक्ष मुख्यालय व अन्य एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी राजकीय चर्चा केली. जिल्हा पंचायत निवडणूक, झालेल्या पालिका निवडणूका, होणाऱ्या पालिका निवडणूका यापेक्षा राज्यातील सातत्याने बदलणारी राजकीय स्थिती, उद्‍भवणारे प्रश्न यावर सखोल चर्चा या बैठकांत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार पुढे काय केले जावे, राज्यशकट हाकताना नजीकच्या काळात कोणते निर्णय अपेक्षित आहेत. पक्षाचे त्‍याबाबत काय म्हणणे आहे, याची पुरेशी कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे.
 

संबंधित बातम्या