राज्याने प्रत्येक मतदारसंघात 'कोविड-19 वॉर रूम' तयार करण्याची गरज 

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

सरकारने राज्यातील कोरोना स्थितीचा गंभीर विचार केलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट एवढ्या तीव्रतेने येईल याचा विचार केला नाही.

पणजी : सरकारने राज्यातील कोरोना स्थितीचा गंभीर विचार केलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट एवढ्या तीव्रतेने येईल याचा विचार केला नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे हे संकट राज्यावर ओढवले आहे, अशी जोरदार टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सरकारने 'कोविड - १९ वॉर रूम' तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  (The state needs to create 'Covid-19 War Room' in every constituency)  

गोवा: 'राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा'

राज्यात सध्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचा गांभीर्याने विकास न करता सरकार ज्याप्रकारे पुढे जात आहे ते पाहता गोवा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे जात असल्याचे दिसत आहे. ही युद्धसदृश्‍य परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्र्यांची ‘भिवपाची गरज ना’वृत्ती यापुढे चालणार नाही. त्यामुळे त्यांनी आता संथगतीने नव्हे तर गतिमान होण्याची तसेच झटपट निर्णय घेण्याची गरज आहे.  राज्याने प्रत्येक मतदारसंघात ‘वॉर रूम’ तयार करायला हवेत. या ‘वॉर रूम’मध्ये इस्पितळांची क्षमता, प्राणवायू उपलब्धता, प्राणवायूयुक्त खाटा, व्हेंटीलेटरवर लक्ष ठेवणारी व सर्व मतदारसंघातील रहिवाशांना डॅशबोर्डवर माहिती देणारे एक समर्पित कृती दल असेल, असे सरदेसाई म्हणाले. 

सरकारची गतिमान पद्धतीने कार्यरत असलेली हेल्पलाईन पूर्णपणे कोलमडलेली आहे. गोमंतकीय अशा स्थितीत जूग शकत नाहीत. लोकांचा मृत्यू होत आहे व या परिस्थितीला फक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार आहेत आणि त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. सावंत हे सर्वांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री नाहीत तर दिल्लीतून निवड झालेले मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते दिल्लीतील भाजप नेत्यांविरुद्ध एक शब्दही उच्चारू शकत नाही असा आरोप त्यांनी केला. 

गोव्यात का मिळते दारू स्वस्त; जाणून घ्या

राज्यभर लोक आणि त्यांचे प्रतिनिधी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी करत आहेत. नगरपालिका आणि पंचायती सरकार ऐकत नसल्याने स्वत:च लॉकडाउन करून त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यांचे निर्देश डावलून घेतलेला निर्णय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाचा अपमान आहे. यावरून हे दर्शविते की ते राज्याचे व्यवस्थापन करण्यास मुख्यमंत्री म्हणून योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन शब्द उच्चारण्यास भीती वाटत आहे कारण त्यांना कळून चुकले आहे की तसे केल्यास त्यांची जागा इतर कोणी घेईल. त्यांना फक्त सत्ता व नियम महत्त्वाचे आहेत मात्र गोमंतकियांचा जीव महत्त्वाचा नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये विकास साधण्यासाठी गेलेल्या त्या दहा आमदारांवरही सडकून टीका आमदार विजय सरदेसाई यांनी करत म्हणाले की, हे आमदार आता शांत का आहेत? गोमंतकियांच्या मृत्यूच्या तुलनेत त्यांचा पक्षपात बराच आहे. 

सरकारने गोव्यात पर्यटक आणण्याचा निर्णय घेतल्यामुळेच राज्यात कोरोना बाधित झालेल्या लोकांची संख्या ५० टक्के अधिक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना गोव्यात पार्ट्या करण्यास परवानगी दिल्या व आता देशात कोरोना संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामध्ये गोव्याचे नाव व प्रतिष्ठा नष्ट होत आहे. गोव्यात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह सक्तीची तसेच काही दिवसांसाठी अलगीकरणात ठेवणे आवश्‍यक होते मात्र सरकारला ते अवघड का गेले असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी केला आहे.
 

संबंधित बातम्या