आयएसएलच्या आजच्या सामन्यात मुंबई सिटीचे पारडे भारी ; अनुभवी खेळाडूंसह नॉर्थईस्टला देणार टक्कर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या तीन मोसमात छाप पाडलेला कल्पक प्रशिक्षक, सोबतीस स्पर्धा गाजवलेले खेळाडू असल्याने मुंबई सिटी एफसीचे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळताना पारडे भारी संभवते. उभय संघांतील सामना आज वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या तीन मोसमात छाप पाडलेला कल्पक प्रशिक्षक, सोबतीस स्पर्धा गाजवलेले खेळाडू असल्याने मुंबई सिटी एफसीचे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळताना पारडे भारी संभवते. उभय संघांतील सामना आज वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.

एफसी गोवातर्फे सफल ठरलेले स्पॅनिश प्रशिक्षक स्पेनचे सर्जिओ लोबेरा यंदा मुंबई सिटीचे प्रशिक्षक आहेत. आपल्या माजी संघातील मंदार राव देसाई, सेनेगलचा मुर्तदा फॉल, मोरोक्कन अहमद जाहू, फ्रेच ह्यूगो बुमूस यांना लोबेरा यांनी मुंबईच्या संघात आणले आहे. मंदार आतापर्यंत आयएसएलमध्ये सर्वाधिक सामने खेळला असून बुमूस गतमोसमातील स्पर्धेत गोल्डन बॉलचा मानकरी ठरला होता. आघाडीफळीत गतमोसमात केरळा ब्लास्टर्सकडून 15 गोल केलेला फ्रेंच नागरिक बार्थोलोमेव ओगबेचे यंदा मुंबई सिटीचे आक्रमण सांभाळणार आहे. त्याच्या सोबतीस इंग्लिश खेळाडू एडम से फाँड्रे असेल. गतमोसमात एफसी गोवाने आयएसएलमध्ये गोलांचे अर्धशतक नोंदविले होते, यंदा लोबेरांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी असाच धडाका राखण्याची अपेक्षा आहे.

नॉर्थईस्टविरुद्धची लढत कठीण असल्याचे मत मुंबई सिटीचे प्रशिक्षक लोबेरा यांनी व्यक्त केले. यंदा मोसम अधिक आव्हानात्मक असून काही चांगले संघ असल्याचे लोबेरा यांनी नमूद केले. दुसरीकडे गुवाहाटीचा नॉर्थईस्ट युनायटेड तसा नवोदित संघ आहे. या संघाचे प्रशिक्षक जेरार्ड नूस अवघ्या 35 वर्षांचे आहेत. खेळाडूही तरुण आहेत. त्यामुळे हा संघ परदेशी खेळाडूंवर जास्त विसंबून असेल. उरुग्वेचा मध्यरक्षक  फेडेरिको गालेगो, फ्रान्सचा खास्सा कामारा, आघाडीपटू इंग्लंडचा क्वेसी अप्पिया व पोर्तुगालचा लुईस माशादो यांच्यावर नॉर्थईस्टची मदार असेल. स्पर्धेपूर्वी दोघे खेळाडू लक्षणे नसलेले कोविड बाधित ठरल्यामुळे दोन दिवस त्यांच्या सरावावरही परिणाम झाला होता. झुंज देईल, पण लढाई सोडून देणार नाही असा झुंजार आणि मजबूत संघ आम्हाला हवा आहे, असे नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक जेरार्ड नूस यांनी सांगितले. यंदाच्या स्पर्धेत त्यांनी प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

गतमोसमातील कामगिरी...

गतमोसमात मुंबई सिटीने आयएसएल स्पर्धेत 18 पैकी सात सामने जिंकले होते, पाचवा क्रमांक मिळाल्यामुळे त्यांना प्ले-ऑफ फेरी थोडक्यात हुकली होती. लोबेरा यांच्यासमोर यंदा ही फेरी गाठणे हे पहिले लक्ष्य असेल. नॉर्थईस्ट युनायटेडची गतमोसमातील कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली. त्यांना 18 लढतीत फक्त दोनच सामने जिंकता आले, दहा संघांत त्यांना नववा क्रमांक मिळाला होता. आयएसएलमध्ये सलग चौदा सामने त्यांनी विजय नोंदविलेला नाही. 

``आम्ही आक्रमक खेळ करतो. सध्याच्या परिस्थितीत कमी काळात मेहनत घेणे सोपे नाही. हे आव्हान असून आम्हाला ते स्वीकारावे लागेल.``

-सर्जिओ लोबेरा,

मुंबई सिटी एफसीचे प्रशिक्षक

आधिक वाचा : 

विराटच्या अनुपस्थितीचा भारतीय फलंदाजीला फटका बसणार ?

गोव्याच्या जलक्रीडा धोरणात बदल..

आयएसएलच्या सातव्या मोसमाला सुरूवात

संबंधित बातम्या