एफसी गोवा संघात बघायला मिळणार नवे चेहरे

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

थकलेल्या एफसी गोवाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली, या नवोदित संघाला फुटबॉलचे धडे देताना इराणच्या मातब्बर पर्सेपोलिस एफसीने आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग सामन्यात चार गोल डागत सलग चौथा विजय नोंदवून ई गटात अव्वल स्थान कायम राखले.

पणजी : थकलेल्या एफसी गोवाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली, या नवोदित संघाला फुटबॉलचे धडे देताना इराणच्या मातब्बर पर्सेपोलिस एफसीने आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग सामन्यात चार गोल डागत सलग चौथा विजय नोंदवून ई गटात अव्वल स्थान कायम राखले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पर्सेपोलिस संघाने एफसी गोवाचा  4-0 असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय प्राप्त केला. त्यांचे आता 12 गुण झाले आहेत, तर दुसऱ्या पराभवामुळे चार लढतीनंतर एफसी गोवाचे दोन गुण कायम राहिले.

एका वर्षाला आयपीएल कमवतं कोट्यवधी एक चेंडू टाकण्याची किंमत लाखात; जाणून घ्या 

सामन्याच्या पूर्वार्धात पर्सेपोलिस संघाने 2-0 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. 24व्या मिनिटास शाहरियार मोघानलौ याला डाव्या पायाचा फटका अडविणे एफसी गोवाचा गोलरक्षक नवीन कुमार याला शक्य झाले नाही, नंतर गोलरक्षक नवीनच्या चुकीमुळे पर्सेपोलिस संघाला पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. त्यावेळी 43व्या मिनिटास माहदी तोराबी याने अचूक नेम साधला. 47व्या मिनिटास ईसा अल्कासिर याने पर्सेपोलिस संघाच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. त्याने हा गोल मोघानलौ याच्या असिस्टवर केला. 58व्या मिनिटास कमाल काम्याबिनिया याने इराणच्या संघासाठी चौथा गोल नोंदविला. यावेळी कॉर्नर किकवर एफसी गोवाचा बचाव कोलमडला.

एफसी गोवा संघात नवे चेहरे

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी स्पर्धेतील तिसऱ्या लढतीनंतर संघातील खेळाडू थकले असल्याची कबुली दिली होती. त्याचे परिणाम शुक्रवारी दिसले. पर्सेपोलिसविरुद्धच्या परतीच्या लढतीत फेरांडो यांनी संघात मोठे बदल करताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. स्पॅनिश इव्हान गोन्झालेझ (कर्णधार) व ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी या परदेशी खेळाडूव्यतिरिक्त अकरा सदस्यीय संघात नऊ भारतीयांची निवड झाली. संघाचा नियमित कर्णधार स्पॅनिश एदू बेदिया दुखापतीमुळे खेळू शकला नाही. अनुभवी सेरिटन फर्नांडिस हा सुद्धा संघाबाहेर राहिला, तर सफल गोलरक्षक धीरज सिंग, सेवियर गामा, ग्लॅन मार्टिन्स, आदिल खान, ब्रँडन फर्नांडिस, स्पॅनिश होर्गे ओर्तिझ यांना विश्रांती देताना राखीव फळीत ठेवले.

हैदराबाद एफसीने गोलरक्षक कट्टीमनीसच्या करारात केली वाढ 

अल वाहदाचा विजय

ई गटातील शुक्रवारी झालेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबने कतारच्या अल रय्यान क्लबवर सलग दुसरा विजय नोंदविला. ओमर ख्रिबिन याने 71व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे त्यांनी सामना 1-0 फरकाने जिंकला. ई गटात आता अल वाहदाचे चार लढतीनंतर सात गुण झाले आहेत, तिसऱ्या पराभवामुळे अल रय्यान क्लब चार लढतीनंतर एका गुणावर कायम राहिला. अहमद अल सय्यद याला 45+1व्या, तर फ्रँक कोम याला 68व्या मिनिटास रेड कार्ड मिळाल्यामुळे अल रय्यानला नऊ खेळाडूंसह खेळावे लागले. सामन्याच्या 90+1 मिनिटास अल वाहदाच्या ईस्माईल मातार याला रेड कार्ड मिळाले. पहिल्या टप्प्यात अल वाहदाने अल रय्यानवर 3-2 फरकाने मात केली होती.

 

संबंधित बातम्या