विंगर लिस्टन कुलासोला कोलकात्यातील एटीके मोहन बागानने केले करारबद्ध 

विंगर लिस्टन कुलासोला कोलकात्यातील एटीके मोहन बागानने केले करारबद्ध 
ATK

पणजी : हैदराबाद एफसीतर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चमकदार खेळ केलेला गोमंतकीय विंगर लिस्टन कुलासो याला कोलकात्यातील एटीके मोहन बागानने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. तो 2023 पर्यंत मरिनर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व करेल. प्राप्त वृत्तानुसार, या 22 वर्षीय लिस्टनसाठी मोठी रक्कम मोजण्यात आल्याची माहिती आहे, पण ती जाहीर करण्यात आलेली नाही. भारतीय फुटबॉलपटूस मिळालेली ही विक्रमी रक्कम असल्याचे सांगण्यात येते. लिस्टनसाठी हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात सामंजस्य करार झाला. (Winger Liston Culaso has been signed by Kolkata-based ATK Mohun Bagan for two years)

दक्षिण गोव्यातील दवर्ली येथील लिस्टन या वर्षी एक जूनपासून स्पॅनिश अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघात रुजू होईल. एटीके मोहन बागान संघ आयएसएल स्पर्धेतील यावेळचा उपविजेता आहे. गोव्यात साळगावकर एफसीतर्फे खेळताना प्रकाशझोतात आलेल्या लिस्टनची 2017 साली एफसी गोवाने निवड केली. मात्र या संघातर्फे विशेष संधी मिळाली नाही. तीन मोसमात तो फक्त आठच सामने खेळू शकला. त्यामुळे जानेवारी 2020 मध्ये त्याने हैदराबाद एफसीशी करार केला. 2020-21 मोसमात मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल स्पर्धेत लिस्टनने 19 सामन्यात 2 गोल आणि 3 असिस्ट अशी कामगिरी नोंदवत लक्ष वेधले.

एकदंरीत लिस्टनने आयएसएल स्पर्धेत हैदराबादचे 23 सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याचा शानदार कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी लिस्टनला भारतीय संघातही स्थान दिले. आयएसएल स्पर्धेतील एकूण 31 सामन्यांत लिस्टनने चार गोल नोंदविले आहेत. "हा माझ्यापाशी मोठा बहुमान आहे. ग्रीन-मरून जर्सीत कोलकात्यात खेळण्याची भावना खूप विशेष आहे. माझ्या फुटबॉल कारकिर्दीत नवा अध्याय सुरू झाला आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी कटीबद्ध राहीन," अशी प्रतिक्रिया लिस्टनने एटीके मोहन बागानच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com