गोव्यात कोविड भितीच्या वातावरणात पाच पालिकांसाठी 66.70 टक्के मतदान

 The five municipal elections in Goa was 66 70 percent turnout
The five municipal elections in Goa was 66 70 percent turnout

पणजी: म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे व सांगे या पाच पालिकांसाठी  कोरोनाचे सावट राज्यात असूनही 66.70 टक्के मतदान झाले. सांगे पालिकेत सर्वाधिक (81.49टक्के) तर मडगाव पालिकेत सर्वांत कमी (64.25 टक्के) मतदान झाले. या पालिकेत 2 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त मतदार होते. मात्र एकानेही मतदान केले नाही. काही मतदान केंद्राच्या परिसरात काही राजकीय नेत्यांत व उमेदवार यांच्यात शाब्दिक चकमकी तसेच आरोप व हरकती घेण्यात आल्या. हे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली. निवडणूक रिंगणात असलेल्या 402 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सील झाले. येत्या सोमवारी 26 रोजी मतमोजणी होणार आहे. 

राज्यात कोविड संसर्गामुळे भीतीचे वातावरण असतानाही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास बाहेर पडले. कोविडचा परिणाम आज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर झाला. मतदार तोंडाला मास्क लावून तसेच रांगेत सुरक्षित अंतर ठेवून उभे होते. संध्याकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आपापल्या पालिकामधील आमदार व मंत्री मतदान केंद्राच्या परिसरात फिरताना दिसत होते. सांगे व केपे या पालिकेमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले, तरी म्हापसा, मडगाव व मुरगाव या पालिकांमध्ये उमेदवारांच्या अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. गेल्या महिन्यात सहा पालिकांसाठी मतदान झाले होते ते सरासरी 83.19 टक्के होते. मतदानाची ही टक्केवारी या तिन्ही पालिकांमध्ये घटल्याने काँग्रेस व भाजपप्रणीत पॅनलच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकूण १ लाख 85 हजार 225 मतदारांपैकी 1 लाख 23 हजार 546 मतदारांनी मतदान केले. 

सकाळपासून संथगतीने सुरवात
पाचही पालिकांमध्ये आज सकाळी 8 वाजता मतदानाला संथगतीने सुरवात झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. प्रभागामध्ये मतदान सुरळीत व शांततेत व्हावे यासाठी पोलिस यंत्रणा गस्तीवर होती. निवडणूक आयोगाची भरारी पथकेही तैनात ठेवण्यात आली होती. सकाळी मतदानाची गती खूपच कमी होती. सुरवातीच्या पहिल्या दोन तासांत सरासरी 16 टक्के मतदान झाले होते. मात्र, केपे व सांगे पालिकेत सरासरीपेक्षा अधिक मतदान झाले. मुरगाव पालिकेत 13.77 टक्के मतदान झाले होते. सकाळी 10 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढून रांगा लागू लागल्या. दुपारी 12 वाजेपर्यंत 33.15 टक्के मतदान झाले होते. दुपारी २ वाजेपर्यंत या पालिकांमध्ये सरासरी 48.76 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये म्हापसा, मडगाव व मुरगाव पालिकांच्या मतदानाची गती वाढली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com