जानेवारीपासून रंगणार गोवा प्रो-लीग फुटबॉल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) यंदाची प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून eखेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यातील फुटबॉल मोसम लांबला आणि त्यामुळे प्रो-लीग स्पर्धाही पुढे गेली.

पणजी :  गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) यंदाची प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यातील फुटबॉल मोसम लांबला आणि त्यामुळे प्रो-लीग स्पर्धाही पुढे गेली.

‘‘गोव्यातील फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच गोव्यात फुटबॉल पुनरागमन करत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आम्ही गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहोत,’’ असे जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल सांगितले. दरवर्षी ऑगस्टमध्ये प्रो-लीग मोसम सुरू होत असे, कोविड-१९मुळे तो डिसेंबरपर्यंत लांबला. आता जानेवारीपासून स्पर्धा खेळविण्याचे निश्चित झाले आहे. ‘‘ही अव्वल श्रेणी स्पर्धा आम्ही कोविडविषयक सर्व मार्गदर्शक शिष्टाचार आणि एसओपीचे पालन करून लीग कार्यरत करू,’’ असे आलेमाव म्हणाले. कोविड-१९ मुळे उद्‍भवलेल्या परिस्थतीमुळे  युवकांनी खेळ न सोडता, तंदुरुस्तीसाठी खडतर मेहनत घ्यावी, असा सल्ला आलेमाव यांनी यावेळी दिला.

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा सर्वोत्तम पद्धतीने खेळविण्याचा विश्वास जीएफएचे उत्तर विभाग उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो यांनी व्यक्त केला. ‘‘प्रोफेशनल लीग स्पर्धेसाठी पुरस्कर्ता असेल आणि ही चांगली बातमी केवळ जीएफएसाठी नव्हे, तर साऱ्या राज्यासाठी आहे. स्पर्धेतील सर्व १२ क्लबनी आता प्रोफेशनल लीग स्पर्धेतील सहभागाच्या तयारीसाठी लागावे. त्यांनी खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. जानेवारी खेळाडू नोंदणीचा दुसरा टप्पा असेल, त्यामुळे त्यांना तेव्हा खेळाडू करारबद्ध करता येतील,’’ असे रिबेलो म्हणाले.

स्पर्धेतील बहुतांश सामने धुळेर-म्हापसा येथील जीएफए स्टेडियमवर खेळले जातील आणि सामने फुटबॉलप्रेमींविना खेळले जातील, असे दक्षिण विभाग उपाध्यक्ष अँथनी पांगो यांनी नमूद केले. सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जीएफएच्या बैठकीस अध्यक्ष चर्चिल आलेमाव, उपाध्यक्ष रिबेलो व पांगो, सचिव ज्योवितो लोपिस, व्यवस्थापकीय समिती सदस्य कॉस्मे ऑलिव्हेरा व दिओनिसियो यांची उपस्थिती होती.

 

दृष्टिक्षेपात...

- कोविड-१९ मुळे गोव्यातील २०१९-२० फुटबॉल मोसम अर्धवट

- गतमोसमात स्पोर्टिंग क्लब द गोवा व चर्चिल ब्रदर्स संयुक्त विजेते घोषित

- यंदाच्या प्रो-लीगमधील बहुतांश सामने धुळेर स्टेडियमवर

- सामने बंद दरवाज्याआड, पण थेट प्रक्षेपण

- प्रो-लीग एकेरी साखळी पद्धतीने होण्याचे संकेत

अधिक वाचा :

न्यूझीलंडमध्ये क्रिकेट मालिकेसाठी दाखल झालेले पाकिस्तानचे खेळाडू बेशिस्त

कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक

ऐतिहासिक कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानचे वर्चस्व 

संबंधित बातम्या